खरे मार्गदर्शकआयुष्यात घडणा-या घटना याच ख-या मार्गदर्शक / संकेत ओळखायला शिका.

तुमचा नशिबावर विश्वास नसला तरी तुम्हांला हे मान्य करावे लागेल की आपल्या आयुष्यात लहान मोठ्या अशा अनेक घटना घडतात की ज्यामुळे आपल्या आयुष्याला एक कलाटणी मिळते. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या या गोष्टी असतात. आपण काही न करताही त्या घटना आपल्या आयुष्यात घडतात व आपल्या आयुष्यावर परिणामही करतात. याचे कारण 'क्रिया आणि प्रतिक्रिया',  'कॅरम बोर्ड थेअरी' या विभागांत तुम्हांला सापडेल. म्हणूनच या घटनांकडे तुम्ही वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले तर या घटनाच तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील. त्यासाठी या घटनांमागील संकेत तुम्ही ओळखले पाहिजे. अनेकवेळा आपण एखाद्या कामासाठी निघत असताना एखादा विचार आपल्या डोक्यात चमकून जातो किंवा एखादी शंका मनात डोकावून जाते. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा कामात काही समस्या निर्माण होतात त्यावेळी आपण म्हणतो हा विचार, ही शंका माझ्या मनात डोकावून गेली होती पण मी दुर्लक्ष केलं. म्हणूनच एखादा विचार किंवा शंका मनात आली तर क्षणभर विचार करा खरंच तसं झालं तर आपण काय करू शकतो किंवा तसे होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी. त्यातूनही समजा आज एखाद्या चुकीमुळे तुमचे दहा हजार रूपयांचे नुकसान झाले असेल तर दुःख करत बसू नका. स्वतःला किंवा इतरांना दोष देत बसू नका. भविष्यामध्ये तुमचे यापेक्षाही अधिक रकमेचे नुकसान होऊ नये म्हणून सावध राहण्याचा संकेत येथे दिला गेलेला आहे हे लक्षात ठेवा. म्हणूनच झालेले दहा हजार रूपयांचे नुकसान कशामुळे झाले व भविष्यात आपण यासंबंधीची कोणती खबरदारी घ्यावी याचा विचार करा. छोट्या अपयशांमागची कारणे शोधून झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी तुम्ही घेत गेलात, तशी सवय तुम्ही स्वतःला लावून घेतली तर मोठ्या अपयशांपासून तुम्ही वाचू शकता.
याचबरोबर आपल्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा एक पॅटर्न ठरलेला असतो. वर्तमानात घडलेल्या एखाद्या घटनेशी साम्य असणारी घटना भूतकाळात घडलेली असते. भलेही ती आपल्या आयुष्यात घडलेली नसेल, आपल्या मित्राच्या आयुष्यात घडलेली असेल किंवा वर्तमानपत्रात वाचलेली असेल, पण या दोन्ही घटनांमध्ये पूर्ण नसले तरी बर्‍याच प्रमाणात साम्य असते. अशावेळी पूर्वी घडलेल्या त्या घटनांच्या संदर्भाने योग्य ती खबरदारी घ्या. पूर्र्वी झालं होतं म्हणून पुन्हा तसंच होईल कशावरून?, ती घटना माझ्याबाबतीत घडली नव्हती तर मित्राच्या किंवा इतर कोणाच्या तरी आयुष्यात घडली होती, माझ्याबाबतीत तसे होणार नाही असे म्हणून दुर्लक्ष करू नका. सावध रहा. योग्य ती खबरदारी घ्या.
            उदाहरणार्थ, समजा तुम्ही एक कंपनी सोडून दुसर्‍या कंपनीत नोकरीला लागलात. नव्या कंपनीत असा एक सहकारी आहे की त्याला पाहून किंवा त्याच्या वागण्या-बोलण्यातून तुम्हांला जुन्या कंपनीतील एखाद्या सहकार्‍याची आठवण येत असेल. याचे वागणे बोलणे अगदी त्याच्यासारखेच आहे असे तुम्हांला वाटत असेल तर विचार करा की त्या जुन्या सहकार्‍यामुळे तुमचे नुकसान तर झालेले नाही ना? त्याने तुमचा विश्वासघात तर केलेला नाही ना? जर जुन्या सहकार्‍याविषयी तुमचा वाईट अनुभव असेल तर त्या नव्या सहकार्‍याशी वागताना योग्य ती खबरदारी तुम्ही घ्यायला हवी. त्याने विश्वासघात केला म्हणून हाही करेल असे नाही, सगळेच लोक काही सारखे नसतात. असे म्हणून दुर्लक्ष करू नका. याचा अर्थ नविन सहकारी जुन्या सहकार्‍याप्रमाणेच वागेल असे १०० % सांगता येत नसले तरीही योग्य ती खबरदारी घेणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. सर्वच ठिकाणी हा नियम लागू करून सावधपणे वागा. एक छोटीशी चूक, निष्काळजीपणा तुमच्या अपयशाला कारणीभूत ठरू शकतो.
            आजकाल रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्याचे गांभीर्य लक्षात ठेवून रहदारीचे नियम पाळणे, आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या रोजच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर नेहमी अपघात होत असतील तर अपघाताची नेमकी ठिकाणे कोणती याकडे लक्ष द्या. या ठिकाणांमध्ये काही साम्य आहे का, ते अपघात क्षेत्र आहे का याकडे लक्ष ठेवून अशा ठिकाणी जास्त सावधगिरीने वाहन चालवावे.
            अशाप्रकारे आपल्या अवतीभोवतीने मिळणारे मार्गदर्शन, संकेत, पॅटर्न यांकडे लक्ष द्या व योग्य ती सावधगिरी बाळगा. अशी सावधगिरी बाळगतानाही त्यात सातत्य हवे. एखाद्यावेळचा निष्काळजीपणाही नुकसानकारक ठरू शकतो.

No comments:

Post a Comment