प्रयोग क्र. १
तुमचा जर नशिबावर किंवा देवावर जास्त विश्वास असेल तर हा प्रयोग तुमच्यासाठी आहे. एखादी गोष्ट केवळ मी म्हणतो म्हणून तुम्ही का विश्वास ठेवायचा? त्यापेक्षा तुम्ही स्वतःच प्रयोग करून पाहा. हा प्रयोग पुढील सात दिवसांसाठी करायचा आहे.
            जे लोक नशिबावर किंवा देवावर विश्वास ठेवतात त्यांच्याही मनात अधूनमधून शंका येत असते की खरंच नशीब असते का? देव खरंच आहे का? यापुढील सात दिवस मनात अशी कोणतीही शंकाकुशंका मनात न धरता नशिबावर किंवा देवावर पूर्णपणे विश्वास ठेवा. आपल्या आयुष्यात चांगल्या-वाईट ज्या काही घटना घडतात त्या आपल्या नशिबात आधीच लिहून ठेवल्या आहेत किंवा या सर्व घटनांवर देवाचे नियंत्रण आहे, या घटना अशाच घडणार होत्या यावर १००% विश्वास ठेवा. सर्व काही देवावर सोपवा. तुम्ही म्हणाल मग आम्ही काहीच करायचे नाही का? नशीबात असेल तर मिळेल, असेल हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हणत गप्प बसायचे? नक्कीच नाही. तुम्ही तुमचे नेहमीचे काम करतच राहायचे आहे. उलट माझे म्हणणे आहे की जर बरेच दिवस तुमचे एखादे काम करू की नको असे म्हणत राहिले असेल तर तेही करून घ्या. मात्र त्या कामात यश मिळेल की अपयश हे नशिबावर किंवा देवावर सोपवा. त्याचा विचार करू नका. तुम्ही तुमची बाकीची कामे करत रहा. उदाहरणार्थ, आपण एक १० रूपयाचे लॉटरीचे तिकीट विकत घेतो. ज्यादिवशी वर्तमानपत्रात निकाल येतो त्यादिवशी पाहतो. लॉटरी लागली तर ठीक नाहीतर तिकीट फाडून फेकून देतो आणि पुन्हा आपल्या कामाला लागतो. जितक्या सहजतेने आपण हे करतो तितक्याच सहजतेने आपण इतर कामे करायची आहेत. यश मिळाले तर ठीक नाहीतर आपल्या पुढच्या कामाला सुरूवात.
            समजा तुम्ही तुमच्या नोकरीत खुश नाही, दुस-या कंपनीत अर्ज पाठवायचा विचार बरेच दिवस तुमच्या मनात चालू आहे पण तुम्ही तो पाठवलेला नाहीये. लगेचच त्या दुस-या कंपनीत अर्ज पाठवून द्या. पण ती नोकरी मिळेल की नाही याबद्दल विचार करू नका. ते नशिबावर किंवा देवावर सोपवा. पुढील सात दिवसांत जर त्यांनी मुलाखतीसाठी बोलावले तर जाऊनही या. नोकरी मिळाली तर ठिक नाहीतर त्या कंपनीत अर्ज पाठवायच्या विचारात तुम्ही अडकून बसला होता तो विचार निघून जाईल आणि सध्याची नोकरी तर आहेच. ब-याच वेळेला पर्याय असणे समस्या निर्माण करतो. दुसरा पर्याय नसेल तर हातातले काम आपण निमुटपणे करतो.          
फक्त हा प्रयोग करताना काही गोष्टी लक्षात ठेवा :
* पुढील सात दिवस नशिबावर किंवा देवावर पूर्णपणे विश्वास ठेवा.
* हे सात दिवस इतरांबरोबर कमी व नेमके बोला. वादविवाद टाळा. तुम्ही अशा तर्‍हेचा प्रयोग करत आहात हे कोणालाही सांगू नका.
* या सात दिवसात तुमच्यासमोर काही अडचणी येऊ शकतात ज्यामुळे तुम्हांला वाटेल हा प्रयोग बंद करावा, पण सात दिवसाच्या आत प्रयोग बंद करू नका.
* प्रयोगासाठी एखादे काम निवडताना फार धोका पत्करू नका. आपण हा प्रयोग करतो आहोत हे लक्षात ठेवा.
* काम असे निवडा ज्याचा निकाल आपल्याला पुढच्या ७ - ८ दिवसांत कळेल.
            तुम्ही म्हणाल यात नुकसान झालं तर आमचंच होणार आहे. म्हणूनच काम निवडताना असे निवडा की जास्त नुकसान होणार नाही आणि आपल्याला प्रयोगाचा निकालही कळेल. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आपण फक्त सात दिवसांसाठी हा प्रयोग करतोय, तुम्हाला वाटलं यश किंवा मानसिक समाधान मिळालं नाही तर सात दिवसांनी प्रयोग बंद करा. जर वाटलं थोडा फायदा झाला आहे तर आणखी सात किंवा जास्त दिवसांसाठी हा प्रयोग पुन्हा करून बघा.

No comments:

Post a Comment