क्रिया आणि प्रतिक्रिया
आता काही लोक म्हणतील आमचा नशिबावरही विश्वास नाही, ज्योतिषावर विश्वास नाही. कोणत्याही गोष्टीत वैज्ञानिक आधार आम्हाला हवा असतो. अशा लोकांसाठी हे पान आहे. तुम्हांला क्रिया आणि प्रतिक्रिया याबद्दल माहितीच आहे. आपल्या आयुष्यात घडणार्‍या घटना या अशा क्रिया आणि प्रतिक्रियांनी होतात. समजा रस्त्याने जाताना तुम्हांला एखाद्याचा धक्का लागला. ही एक क्रिया घडली. त्याला तुम्ही कशी प्रतिक्रिया देणार यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही दुर्लक्ष करून पुढे गेलात किंवा त्याच्याकडे बघून स्मितहास्य केलंत तर तो विषय तिथेच संपेल. समजा तुम्ही त्याला रागाने काही बोललात तर तुमची ही तिखट प्रतिक्रिया त्याच्यासाठी एक क्रिया ठरेल. तुमच्याकडून झालेल्या या क्रियेला तो काय प्रतिक्रिया देतो यावर आता पुढील गोष्टी अवलंबून आहेत. त्याने शांत प्रतिक्रिया दिली, त्याने दिलगिरी व्यक्त केली तर तो विषय लवकर संपेल मात्र त्यानेही तिखट प्रतिक्रिया दिली तर विषय वाढत जाईल. तुमचे कदाचित जोरात भांडणही होईल. अशा भांडणामुळे आपण ज्या कामासाठी चाललो आहोत त्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे एखादी घटना ही आपल्यासाठी क्रिया ठरते, त्याला आपण कशी प्रतिक्रिया देतो यावर पुढील गोष्टी अवलंबून असतात.
            क्रिया आणि प्रतिक्रियेच्या बाबतीत एकच समस्या आहे की आपण कशी प्रतिक्रिया देईन हे आपल्या हातात असते मात समोरचा आपल्याला कशी प्रतिक्रिया देईल यावर आपले नियंतण नसते. त्यामुळे समोरची प्रतिक्रिया ही आपल्याला अनपेक्षित असते. तसेच त्याची प्रतिक्रिया कशी असेल हे त्याची त्यावेळी मानसिक स्थिती कशी आहे त्यावर अवलंबून असते. तो आनंदी आहे, रागात आहे की दुःखी आहे यावर त्याची प्रतिक्रिया अवलंबून असेल. त्यामुळे आपल्याला यासाठीच प्रयत्न करायचा आहे की आपली क्रिया किंवा प्रतिक्रिया ही व्यवस्थित असावी, आपल्या क्रियेनंतर किंवा प्रतिक्रियेनंतर पुढील घटना चांगल्या घडाव्यात. पण बर्‍याच वेळा अशा घटना घडतात की आपण नेमकी कशी प्रतिक्रिया द्यावी हे आपल्याला कळत नाही. अशावेळी निर्णय घेताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याबद्दल आपण पुढील पाठात माहिती घेणारच आहोत. येथे आणखी एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की बर्‍याच वेळा एखाद्य व्यक्तीने दुसर्‍या एखाद्या ठिकाणी व तुमच्या अनुपस्थितीत केलेल्या क्रियेचा परिणाम तुमच्या आयुष्यात होतो. उदाहरणार्थ तुम्ही एक व्यावसायिक आहात. तुमच्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याने नाकारलेले एखादे काम तुम्हांला मिळू शकते व तुमचा फायदा होऊ शकतो. म्हणजेच प्रतिस्पर्ध्याने केलेल्या क्रियेचा तुमच्या आयुष्यावर परिणाम झाला. याठिकाणी प्रतिस्पर्ध्याने काम नाकारणे या क्रियेमध्ये तुमचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नव्हता तरीदेखील त्या क्रियेचा परिणाम तुमच्या आयुष्यावर झाला. अशा घटनांसंबंधी आणखी चर्चा आपण पुढील भागांमध्ये करणारच आहोत.

No comments:

Post a Comment