कम्प्युटर/मोबाईल गेम
एखादी जबाबदारी किंवा काम घेण्याविषयी आपण शिकलो पण हे काम पूर्ण करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?
तुम्ही कम्प्युटरमधील किंवा तुमच्या मोबाईलमधील गेम खेळला किंवा पाहिला असेलच. या गेमची काही वैशिष्ट्ये तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हांला तुमचे काम पूर्ण करताना ते मार्गदर्शक ठरेल.

वैशिष्ट्य १ : ही गेम खूप मोठी असते पण त्याची छोट्या छोट्या लेव्हलमध्ये (टप्प्यांमध्ये) विभागणी केलेली असते. उदा. लेव्हल १, लेव्हल २ इ. याचप्रमाणे आपण आपल्या कामाची छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागणी करणे गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काय केले पाहिजे, दुसर्‍या टप्प्यामध्ये काय केले पाहिजे याची आखणी करा.

वैशिष्ट्य २ : गेमच्या प्रत्येक लेव्हलमध्ये अनेक समस्या आपल्यासमोर येत असतात, त्या सोडवत आपण पुढे जातो व ती लेव्हल पार करतो. याचप्रमाणे आपल्या कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या आपल्यासमोर येत असतात. या समस्या अनेकवेळा अनपेक्षित असतात. त्या समस्यांवर मात करत आपल्याला पुढचा टप्पा गाठायचा असतो.

वैशिष्ट्य ३ : जेव्हा आपण गेमची पहिली लेव्हल सोडवत असतो त्यावेळी दुसर्‍या लेव्हलमध्ये किती समस्या असतील याचा विचार करत नसतो. त्याचप्रमाणे आपल्या कामाच्या पहिल्या टप्प्यामधील समस्या सोडवत असताना पुढच्या टप्प्यांमध्ये कोणत्या समस्या असतील, त्या समस्या आत्ताच्या समस्यांपेक्षा खूप अवघड, मोठ्या असतील म्हणून चिंता करत बसू नका. तुमचे लक्ष केवळ पहिल्या टप्प्यामधील समस्या सोडविण्यावर केंद्रीत करा.

वैशिष्ट्य ४ : अनेक गेममध्ये पहिला टप्पाही पूर्णपणे दिसत नसतो. एकेक समस्या सोडवत आपल्याला पुढे जायचे असते व ठराविक समस्या पार केल्यानंतर आपला पहिला टप्पा पार होतो व आपण दुसर्‍या टप्प्यामध्ये प्रवेश करतो. याचप्रमाणे आपल्या पहिल्याच टप्प्यामध्ये जर अनेक समस्या उभ्या ठाकल्या तर त्यातल्या एकेक समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रीत करा. एकदम सर्व समस्यांचे ओझे अंगावर घेऊ नका. एकेक समस्या सोडवित गेला की पहिला टप्पा कधी पार झाला तुम्हांला समजणारही नाही.

No comments:

Post a Comment