कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन !
'कर्म करा फळाची अपेक्षा धरू नका' हे वाक्य आपण बर्‍याचवेळा ऐकतो. फळाची अपेक्षाच करायची नसेल तर कर्म करून काय उपयोग? असेही आपण ऐकतो. यासाठी याठिकाणी मी 'अपेक्षा' हा शब्द वापरला आहे. फळाची इच्छा धरा मात्र अपेक्षा धरू नका. तुम्ही म्हणाल अपेक्षा आणि इच्छा यामध्ये काय फरक आहे? हा फरक आपण एका उदाहरणासह समजून घेऊ. जेव्हा तुमची इच्छा असते की परिक्षेत आपला पहिला नंबर यावा तेव्हा आपला पहिल्याऐवजी दुसरा नंबर येऊ शकतो याची जाणीव तुम्हांला असते त्यामुळे जर परिक्षेत दुसरा नंबर आला तर तुम्हांला कमी दुःख होते. हा दुसरा नंबरही काही प्रमाणात तुम्हांला समाधान देऊन जातो. मात्र परिक्षेत पहिला नंबर यावा ही अपेक्षा तुम्ही बाळगता तेव्हा पहिलाच नंबर आला पाहिजे असा हट्ट तुमच्या मनात तयार होतो. दुसरा नंबर आला तर काय? हा प्रश्नही तुम्हांला त्रास देऊ लागतो. अशावेळी जर खरंच तुमचा दुसरा नंबर आला तर तुम्हांला अतिदुःख होते, तुम्हांला मानसिक नैराश्य येऊ शकते. म्हणूनच कोणत्याही कामात फळाची इच्छा मनात धरा मात्र अपेक्षा धरू नका. पण आपल्या मनातली गोष्ट ही इच्छा आहे का अपेक्षा हे कसे ओळखायचे? सोपं आहे. जर तुम्हांला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले तर तुम्हांला किती मानसिक त्रास होईल यावरून या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. कमी यशाने तुम्हांला जर मानसिक त्रास जास्त होणार असेल तर ती तुमची अपेक्षा असते. खास करून आजकाल पालकांना आपल्या मुलांबद्दल फार मोठ्या अपेक्षा असतात. या अपेक्षांच्या ओझ्याखाली अनेक मुले दबत चालली आहेत. म्हणूनच वेळीच आपल्या मनाला आवर घाला, म्हणजे पुढील काळातील संभाव्य त्रास कमी होईल.

No comments:

Post a Comment