पालकांसाठी महत्त्वाचे
सर्वच पालक आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी झटत असतात. मुलांच्या इच्छा-आकांक्षा तसेच त्यांचे उ शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई-वडील अहोरात्र कष्ट करत असतात. मात्र काही पालक स्वतःच्या इच्छा आकांक्षा मुलांवर लादत असतात. आपण जे करू शकलो नाही ते मुलांनी करावे असा त्यांचा अट्टाहास असतो. आजकाल तर मुलांनी परिक्षेतही चांगले मिळवायला हवेत आणि एखाद्या नृत्यस्पर्धेत किंवा गायनस्पर्धेत किंवा अशाच इतर स्पर्धांमधूनही यश मिळवायला हवे असे पालकांना वाटते. आपल्या मुलांची तुलना सतत इतरांच्या मुलांबरोबर केली जाते व आपल्या मुलाने इतरांपेक्षा जास्त यश मिळवायला हवे यासाठी मुलांवर दबाव टाकला जातो. यामुळे खरंतर मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. आपण इतरांपेक्षा सर्वच क्षेत्रात कमी आहोत असे मुलांना वाटू लागते. ते आपला आत्मविश्वास गमावून बसतात. त्यांच्या मनात भिती साठू लागते. यातूनच परिक्षेत मार्क कमी पडले किंवा नापास झालो तर आई-वडील रागावतील, मारतील म्हणून मुले आत्महत्या करतात. परिक्षेत चांगले मार्क पडले तरच आपला मुलगा भविष्यात यशस्वी होईल असे नाही. मुलाला परिक्षेत मार्क कमी पडत असतील तर इतर कोणते कलागुण आपल्या मुलांमध्ये आहेत याकडे लक्ष द्या व त्यानुसार त्याच्या कलागुणांना वाव मिळेल यासाठी प्रयत्न करा. कदाचित इतरांपेक्षा तो कमी पैसे मिळवेल परंतु आवडत्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे सुखी जीवन तो जगेल. मुले सुखी रहावीत हेच तर आपल्याला हवे असते. मात्र हे करत असताना समजा तुमचा मुलगा त्याच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी झाला नाही तर त्याला दोष देऊ नका उलट त्याच्या मनात नेहमीच एक विश्वास निर्माण करा की 'बाळा, जरी तुझा एखादा निर्णय चुकला, फार मोठ्या अपयशाला तुला सामोरे जावे लागले तरी काळजी करू नको, तुला सावरायला सतत आम्ही तुझ्या पाठीशी आहोत'. हा मानसिक आधार जर तुम्ही आपल्या मुलांना दिलात तर नक्कीच ते आपल्या आयुष्यात यशस्वी होतील. मुलांवर दबाव टाकण्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करा म्हणजेच त्यांचे आयुष्य खुलेल.
            आणखी एक गोष्ट मी पालकांना सांगू इच्छितो की बरेच पालक ' तू फक्त अभ्यास करून चांगले मार्क मिळव, बाकी सगळी कामे आम्ही करतो', 'हे काम तुला जमणार नाही, माझं मी करतो' असे म्हणत मुलांवर कोणतीही जबाबदारी टाकत नाहीत. पण यामुळे मुलांना व्यावहारिक ज्ञान काहीच मिळत नाही. ते मानसिकरित्या दुबळे बनत जातात. एखादी जबाबदारी स्विकारण्याची किंवा एखादे काम स्वतःहून करण्याची त्यांची मानसिकता बनत नाही. सतत त्यांना कुणाच्या तरी मदतीची आवश्यकता भासते. म्हणूनच लहानपणापासूनच त्यांना बारीकसारीक कामे सांगत जा. स्वतःची कामे तसेच घरातील छोट्यामोठ्या जबाबदार्‍या त्यांना स्वतः पार पाडायला सांगा. तुम्ही फक्त आवश्यक ते मार्गदर्शन करा. जर त्यांच्या हातून काही चूक घडली तर ओरडू नका. त्यांना समजावून सांगा. ते चुक़ा करतात म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकण्याचे बंद करू नका. तरच तो भविष्यकाळात कोणतीही जबाबदारी पेलण्यास सक्षम बनेल.

No comments:

Post a Comment