नशीब आणि कर्मविभाग एक :
या विभागात मी अशा गोष्टी मांडल्या आहेत ज्यावर आपण विश्वास ठेवतो, आपल्या जीवनावर त्यांचा प्रभाव पडतो. या गोष्टींचे मी विविध गटात वर्गीकरण केले आहे. त्यापैकी तुम्ही कोणत्या गटात बसता याचा विचार करा. त्यानुसारच यापुढील आयुष्यात काय केले पाहिजे ते आपण ठरवू शकतो. चला तर मग सुरूवात करूया.

नशीब आणि कर्म:नशीब हा शब्द वाचला, ऐकला तर काहीजण वादाला सुरूवात करतात. नशीब वगैरे काही नसते, आपले नशीब आपल्या हातात असते असे म्हणू लागतात. खरंतर नशीब हाच शब्द कमनशिबी आहे असे मला वाटते कारण कोणत्याही वाईट गोष्टीचे खापर नशिबावर फोडले जाते आणि चांगल्या गोष्टी घडल्या की आपले कर्म आठवते. यश मिळाले की मी खूप कष्ट केले, दिवसरात्र जागलो २०-२० तास काम केले असे सांगू लागतो मात्र जेव्हा अपयश पदरी पडते तेव्हा माझं नशीबच खोटं, माझ्या नशीबातच नव्हतं असं म्हणून मोकळे होतो. तुम्हांला जर यशाचे श्रेय स्वतःकडे घ्यायचे असेल तर अपयशाची जबाबदारीही घेतली पाहिजे किंवा अपयशाचे खापर नशीबावर फोडायचे असेल तर यशाचे श्रेयही नशिबाला द्यायला हवे.
            पण खरंच नशीब असतं का? यासाठी मी तुम्हांला एक गोष्ट सांगतो. फार पूर्वीची गोष्ट आहे. एका तरूणाने वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि वैद्य म्हणून काम करू लागला. पण त्याच्या गावात त्याला फारसे पैसे मिळत नव्हते. त्याला कोणीतरी सल्ला दिला की त्याने रामपूरला जावे तेथे त्याला चांगले यश मिळेल. तेव्हा त्याने रामपूरला जाण्याचा निर्णय घेतला. तो रस्त्याने चालू लागला. बरेच अंतर गेल्यावर त्याच्यासमोर दोन रस्ते आले. त्याला प्रश्न पडला की यापैकी रामपूरला जाणारा रस्ता कोणता? तेवढ्यात त्याला समोरून एक माणूस येताना दिसला. वैद्यबुवाने त्याला रस्ता विचारला. त्या माणसाने रस्ता सांगितला. वैद्य त्यानुसार चालत राहला. बरेच अंतर चालल्यावर तो एका गावात आला. तेथे पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की त्याने एक वळण चुकीचे घेतले त्यामुळे रामपुरऐवजी तो लक्ष्मणपुरात पोहोचला होता. चालून खूप दमल्यामुळे तेथेच एका झाडाखाली तो विश्रांतीसाठी थांबला. थोड्यावेळाने त्याच्यापासून थोड्या अंतरावर एक घोळका जमला व गडबड गोंधळ उडाला. वैद्याने तेथे जाऊन पाहिले तर तेथे एक माणूस बेशुद्ध पडला होता. वैद्याने त्वरीत त्याचा इलाज केला. तो माणूस शुद्धीवर आला. त्याने वैद्याचे आभार मानले आणि घरी भोजनास आग्रहाचे निमंत्रण दिले. तो माणूस अतिशय श्रीमंत व प्रतिष्ठीत होता. त्याने वैद्याला त्यांच्याच गावात राहण्याची विनंती केली व त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली. वैद्याने होकार दिला. काही कालावधीतच तो वैद्य लोकप्रिय झाला व त्याची किर्ती ऐकून आसपासच्या गावातील लोकही त्याच्याकडे येऊ लागले. पुढे त्या श्रीमंत माणसाच्याच मुलीशी त्याचे लग्र झाले व पुढील आयुष्य त्याने सुखाने व्यतित केले.
            आता ही गोष्ट जरी काल्पनिक असली तरी असे आपल्याही आयुष्यात घडू शकते किंवा घडलेही असेल. या गोष्टीवरून आपल्या लक्षात येईल की यात नशीब आणि कर्म दोन्हीचा सहभाग आहे. न मागता स्वा मिळणे, रस्ता चुकून लक्ष्मणपुरात पोहोचणे, श्रीमंत व्यक्ती बेशुद्ध पडला त्यावेळी हा वैद्य तेथे हजर असणे हा नशीबाचा भाग आहे तर मिळालेला स्वा मानून रामपुरला जाण्याचा निर्णय घेणे, आपल्या शिक्षणाचा उपयोग करून त्या व्यक्तीला बरे करणे, आपल्या कार्याने प्रसिद्धी मिळवणे हा त्याच्या कर्माचा भाग आहे. तुम्ही म्हणाल, मग हे तर सर्वचजण सांगतात मी वेगळे असे काय सांगितले. पुढील पाठामध्ये याबद्दल मी आणखी बोलणार आहेच त्यापूर्वी आणखी एका मुद्‌द्याचा विचार करू.

No comments:

Post a Comment