ज्योतिषशास्त्र
ज्योतिषशास्त्राला आपण शास्त्र म्हणतो. म्हणजेच त्यापाठीमागे बराचसा अभ्यास आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्र चुकीचे आहे असे मी म्हणणार नाही मात्र त्याचा वापर आज चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. आज लोक देवाबरोबरच ज्योतिषांच्याही आहारी गेले आहेत असे वाटते. प्रत्येक कामाची सुरूवात करण्यापूर्वी ज्योतिषाकडे धाव. काहीजणांचे तर तीन-चार ज्योतिषी असतात. प्रत्येकाच्या सांगण्यात थोडा फार फरक पडतो. त्यापैकी एका कोणाचे तरी बरोबर येते. मग पुढच्या वेळी त्या ज्योतिषाकडे पहिला जायचे मग बाकीच्यांकडे. त्यावेळी दुसर्‍याच ज्योतिषाचे बरोबर येते. मग पुढच्यावेळी त्या ज्योतिषाकडे आधी जायचे. एखादेवेळी तिघांचेही चुकीचे येते, त्यावेळी कोणीतरी नविन ज्योतिषाचे नाव सांगते तेव्हा त्याच्याकडे धाव घेतली जाते. यात आपले आयुष्य निघून जाते. हेच संस्कार मग आपल्या मुलांवरही होतात. तेही मग ज्योतिषाच्या मागे आपले आयुष्य घालवतात.
            याठिकाणी आपण थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करू. लग्राच्यावेळी मुलाची व मुलीची पत्रिका जुळणे गरजेचे मानले जाते. जर पत्रिका जुळली नाही तर दोघांचे सांसारिक आयुष्य कठीण जाते असे म्हणतात. हे जर खरे मानले तर याचा अर्थ आपले सांसारिक आयुष्य केवळ आपल्या पत्रिकेवर नाही तर जोडीदाराच्या पत्रिकेवरही अवलंबून असते. म्हणजे तुमच्या पत्रिकेचे महत्त्व ५०% उरले. हीच बाब मग इतर सर्वच बाबतींत लागू धरावी लागेल. कारण बर्‍याच वेळा नवरा-बायकोचे व्यवस्थित पटत असते मात्र सासू-सूनेचे पटत नसते. अशावेळी घरातील वातावरण बिघडते व नवरा बायकोमध्येही काहीवेळा भांडणे होतात व शेवटी आई-वडीलांपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला जातो. म्हणजे याठिकाणी जर नवरा, बायको, सासू, सासरे असे चौघे एकत्र राहणार असतील तर सर्वांची पत्रिका एकमेकांशी जुळते का ते पाहावे लागेल तरच घरात वातावरण चांगले राहण्याची अपेक्षा धरू शकतो. म्हणजे आता आपले सांसारिक जीवन चांगले राहण्यासाठी आपल्या पत्रिकेचे महत्त्व २५% च उरले. आपल्या कामाच्या ठिकाणी आपले बॉस, आपले सहकारी या सर्वांशी आपले व्यवस्थित पटत असेल तर अशा ठिकाणी आपण व्यवस्थित काम करू शकतो. म्हणजेच आपली पत्रिका आपल्या बॉसबरोबर अथवा आपल्या सहकार्‍यांबरोबर जुळते का हे येथे महत्त्वाचे मानावे लागेल. म्हणजे करिअरच्या बाबतीतही आपल्या पत्रिकेवर १००% विश्वास ठेवू शकत नाही. मात्र अशा पत्रिकेच्या नादात आपण मानसिकरित्या दुबळे होत जातो. त्यामुळे मी एवढेच म्हणेन प्रयोग म्हणून काही कामे जी पूर्वी तुम्ही पत्रिका पाहून करत होता ती पत्रिका न पाहता करा व आपला अनुभव पाहा. निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे.
            याठिकाणी आणखी एक विचार मला मांडायचा आहे. ज्योतिषाकडे जर तुम्ही एखादा प्रश्न घेऊन गेला तर तो सांगेल ग्रहस्थिती खराब आहे किंवा पत्रिकेत दोष आहे. तो एखादा उपवास करायला सांगेल, दर आठवड्याला एखाद्या देवाला जायला सांगेल, एखादी शांती करायला सांगेल, एखाद्या देवाचा जप करायला सांगेल. तुम्ही जर वास्तुशास्त्र तज्ज्ञाकडे तोच प्रश्न घेऊन गेला तर तो वास्तुतील एखादा दोष शोधून काढेल. प्रत्येकजण आपल्या प्रमाणे उपाय सांगेल. एवढे सगळे करून जर प्रश्न सुटला नाही तर नशिबावर खापर फोडून आपण गप्प बसतो. म्हणजे फक्त एकावर विश्वास ठेवायचा तर दुसरे बिनकामी ठरतात किंवा जर सगळेच खरे मानायचे तर प्रत्येक गोष्ट १००% खरी नाही हे लक्षात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्या बाबतीत व्यवस्थित आहेत असे होणे दुरापास्त असते. त्यामुळे या सर्व गोष्टींच्या किती आहारी जायचे हे आपणच ठरवायचे.

No comments:

Post a Comment