रेसिपी बदला, पदार्थ बदलेल
एखाद्या कामात पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही तुम्हांला अपयशच मिळत आहे का? मी कोणतही काम हातात घेतलं तरी मला अपयशच मिळतं किंवा काम पूर्ण होतच नाही अशी तुमची तक्रार आहे का? असे असेल तर हे वाक्य लक्षात ठेवा, 'रेसिपी बदला, पदार्थ बदलेल.' याचा अर्थ काय?
            समजा तुम्ही एखादा खाद्य पदार्थ करत आहात पण दरवेळी मिळणारा पदार्थ 'कांदा भजी' हाच आहे. यावेळी तुम्हांला कांदा भजी नको, दुसरा एखादा पदार्थ तयार व्हावा असे तुम्हांला वाटते. अशावेळी तुम्हांला काय करावे लागेल? अर्थातच तुम्हांला रेसिपी बदलायला लागेल म्हणजे तुम्हांला मिळणारा पदार्थही बदलेल. जर संपूर्ण रेसिपी तुम्ही बदलू शकत नसाल तर निदान रेसिपीमध्ये थोडासा बदल करून तुम्ही कांदा भजीऐवजी पालक भजी, बटाटा वडे किंवा पिठले तरी बनवू शकता.
            याचप्रमाणे दरवेळी तुम्हांला अपयशच मिळत असेल आणि अर्थातच ते तुम्हांला नको असते, अशावेळी तुम्ही केलेल्या अथवा दरवेळी करत असलेल्या कृतींचा विचार करा, अवलंबिलेल्या मार्गांचा विचार करा. पुढच्यावेळी या कृतींमध्ये थोडाफार प्रमाणात तरी बदल करा, थोडा वेगळा मार्ग धरा. मी आजपर्यंत अशी कृती केली नाही, या मार्गाने मी कधी गेलो नाही असे म्हणत गप्प बसू नका. लोक हसतील, नावे ठेवतील यासारखे नकारात्मक विचार करू नका. आतापर्यंत आपण जे करत आलो आहे त्यामुळे अपयशच मिळत आले आहे म्हणून त्यापेक्षा काहीतरी वेगळे तुम्हांला यावेळी करायचे आहे, हे लक्षात ठेवा. (अर्थातच यासाठी कोणत्याही गैर मार्गांचा वापर करू नका.) आधीपेक्षा वेगळी रेसिपी वापरली तरच तुम्हांला वेगळा पदार्थ मिळेल हे लक्षात ठेवा. थोड्याच दिवसांत यशाकडे तुमची वाटचाल सुरू झाली आहे याची जाणीव तुम्हांला होईल.

No comments:

Post a Comment