नशीबात असते तेच होते
या पुस्तकाच्या सुरूवातीलाच मी नशिबासंबंधीचा मुद्दा मांडला. त्यावेळी तो मुद्दा मी अपूर्ण ठेवला होता. तोच याठिकाणी मी पूर्ण करणार आहे. अर्थातच ज्यांचा नशिबावर विश्वास आहे त्यांच्यासाठीच मी हे सांगत आहे. नशिबावरील विश्वासाचाच आधार घेऊन आपण चिंतामुक्तीकडे आणि यशाकडे कशी वाटचाल करू शकतो हे पाहूया.
            मी एखाद्याला जेव्हा म्हणतो की नशिबात असते तेच होते तेव्हा ते म्हणतात की म्हणजे आपण काही करायलाच नको. माझ्या नशिबात लिहिलेले असेल की परिक्षेत माझा पहिला नंबर येणार आहे तर तो येईलच की मी अभ्यास कशाला करायला पाहिजे. अशावेळी मी उत्तर देतो की जर तुमच्या नशिबात पहिला नंबर असेल तर तुम्ही निवांत बसूच शकत नाही. त्यासाठी आवश्यक ती तयारी तुमच्या हातून घडतेच. तुम्ही तुमचा भूतकाळ आठवून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यात जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती घटना घडण्यासाठी आवश्यक गोष्टी, कामे एकापाठोपाठ घडत जातात. कधी या गोष्टी कळत नकळत तुमच्या हातून घडतात तर कधी इतरांकडून त्या घडतात. म्हणजेच बर्‍याचवेळेला या गोष्टी आपल्या नियंत्रणापलिकडे असतात तर कधी त्या अज्ञानाने आपल्याकडून घडतात. घडलेल्या सर्व गोष्टींचा क्रम लक्षात घेतला तर असे वाटते की हे सर्व पूर्वनियोजित तर नव्हते? कोणती तरी अज्ञात शक्ती हे सर्व घडवत तर नव्हती ना? यालाच आपण नशीब म्हणतो.
           
आता या नशिबाचा वापर करून चिंतामुक्ती कशी साधायची हे पाहू. त्यासाठी तुम्हांला तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.
१) तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तो १०० % ठेवा. मिळालेले अपयशही नशिबामुळे मिळते आणि मिळालेले यशही नशिबामुळेच मिळते हे मनात पक्के करा.
२) नशिबात लिहिल्याप्रमाणे तुम्हांला एखाद्या कामात यश मिळणार असेल तर इतर कोणी कितीही विरोध करू दे, कितीही अडचणी येऊ देत, तुम्हांला यश मिळणारच. यश मिळण्यासाठी तुमचे प्रयत्न जर अपुरे पडत असतील तर दुसरी व्यक्ती येऊन तुम्हांला मदत करेल व तुमचे काम पूर्ण होईल.
३) नशिबात लिहिल्याप्रमाणे तुमचे एखादे काम होणार नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा ते काम पूर्ण होणार नाहीच. तुम्हांला अपेक्षित यश मिळणार नाहीच.

            हे तीन मुद्दे लक्षात ठेवा आणि हातात घेतलेले काम पूर्ण होईल की नाही, अपेक्षित यश मिळेल की नाही याची चिंता करत बसू नका. मनात कोणतीही भिती बाळगू नका. यश मिळाले तर आनंदाने हुरळून जाऊ नका. त्या गोष्टीचा गर्व करू नका. अपयश मिळाले तर खचून जाऊन नका. रडत बसू नका. स्वतःला किंवा इतरांना दोष देत बसू नका. यश अपयश, चांगल्या-वाईट गोष्टी हे सर्व नशिबात लिहिल्याप्रमाणेच मिळालेले आहे. आपण केवळ माध्यम आहोत. जे घडले ते कोणत्याही परिस्थितीत असेच घडणार होते. आपण किंवा इतर कोणी त्यात बदल करू शकलो नसतो हे लक्षात ठेवा. सर्वच गोष्टींची जबाबदारी नशिबावर टाकल्यामुळे तुम्ही आनंद-दुःख, चिंता-भिती, गर्व अशा मानसिक द्वंद्वातून मुक्त व्हाल. तुम्हांला हलके हलके वाटू लागेल. तुम्हांला मानसिक थकवा जाणवणार नाही. तुम्ही तुमचे काम निर्धास्तपणे करू लागाल. अपयश मिळाले तर ते पचवून पुन्हा पुढच्या कामास सुरूवात करू शकाल.
            तुम्ही जेव्हा एखाद्या जत्रेत जाता तेथे अनेक प्रकारचे खेळ असतात. समोर अनेक वस्तू मांडलेल्या असतात. तुम्ही रिंग फेकायची असते. जी वस्तू त्या रिंगमध्ये व्यवस्थित अडकेल ती वस्तू तुम्हांला मिळेल असे सांगण्यात येते. क्वचितच आपल्याला बक्षिस मिळते पण जरी आपल्याला बक्षिस मिळाले नाही, आपण अपयशी ठरलो तरी तो खेळ आपण 'एन्जॉय' केलेला असतो. एक खेळ खेळून झाल्यावर आपण पुढच्या दुकानात जाऊन दुसरा खेळ खेळू लागतो. खेळलेले सर्व खेळ जरी आपण हरलो तरी जत्रेतून बाहेर पडताना आपण आनंदाने बाहेर पडत असतो. आता आपल्याला असाच खेळ आपल्या नशिबाबरोबर खेळायचा आहे. एखादे असे काम शोधून काढा की ते काम आपल्याकडून पूर्ण होईल की नाही, आपल्याला अपयश तर येणार नाही ना, हे काम करताना खूप अडचणी येतील अशा अनेक शंका-कुशंकांमुळे, भीतीमुळे तुम्ही बाजूला ठेवले आहे. अशा कामाची सुरूवात तुम्हांला आज करायची आहे. या कामात यश मिळेल की अपयश हे तुम्हांला पाहायचे आहे अगदी तसेच जसे जत्रेत तुम्ही खेळून पाहता. तुम्ही एक व्यक्ती आणि नशिब हे तुमच्यासमोरील दुसरी व्यक्ती असे समजून त्याच्याशी तुम्हांला खेळायचे आहे. त्यासाठी अर्थातच सुरूवातीला छोटी छोटी, जास्त नुकसान होणार नाही अशी कामे निवडा. 'बघुया हे काम करून, यात यश मिळते का' असा सहजसोपा विचार करा. या प्रयोगासाठी वर दिलेले तीन महत्त्वाचे मुद्दे मात्र विसरू नका.

No comments:

Post a Comment