सुरूवात तर करा
अनेकवेळा मोठ्या कामाची सुरूवात करताना मनात शंका, भिती निर्माण होते. हे काम माझ्याकडून पूर्ण होईल की नाही, कामात खूप अडचणी येतील का, येणार्‍या अडचणी कशा सोडवता येतील, कोणाची मदत मिळेल की नाही, काम पूर्ण करण्यासाठी कोणता मार्ग आहे अशा एक ना अनेक शंका मनात घर करू लागतात. यामुळे आपले काम सुरूच होऊ शकत नाही. अशावेळी पुढील अडचणींचा विचार न करता तात्काळ कामाला सुरूवात करा. पुढील मार्ग तुम्हांला आपोआपच दिसत जाईल, येणार्‍या अडचणींवर मात करण्याचे उपाय सापडत जातील.
            मी एका वर्तमानपत्रात वाचलेली गोष्ट तुम्हांला सांगू इच्छितो. ही एक जुन्या काळातील गोष्ट आहे. त्यावेळी वीज नव्हती, टॉर्च नव्हती. इकडे तिकडे जाताना कंदिल घेऊन जावं लागे. अशा काळातील ही गोष्ट. एका गावापासून थोडेसे दूर एका डोंगरावर एक छोटेसे मंदिर होते. एक माणूस हातात कंदिल घेऊन त्या मंदिरात जायला निघतो. मात्र डोंगराच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत पूर्ण अंधार पडतो. त्याच्यासमोर प्रश्न पडतो एवढ्या काळाकुट्ट अंधारात एवढा मोठा डोंगर एका छोट्याशा कंदिलाच्या मदतीने कसा पार करायचा? तो डोंगराच्या पायथ्याशीच बसून राहतो. थोड्यावेळाने दुसरा एक मनुष्य डोंगर उतरत खाली येतो. त्याच्या हातातही तेवढाच छोटासा कंदिल असतो. पहिला माणूस आश्चर्याने त्याला विचारतो, 'एवढा मोठा डोंगर तू कसा उतरत आलास?' तो माणूस म्हणाला, 'पहिल्यांदा कंदिलाच्या प्रकाशात मला जेवढा रस्ता दिसत होता तेवढाच रस्ता मी पार केला. मात्र जसा मी थोडा पुढे गेलो, अंधारामुळे आधी न दिसणारा थोडासा रस्ता मला कंदिलाच्या प्रकाशात दिसू लागला. मी आणखी थोडा पुढे गेलो, मला आणखी पुढचा रस्ता दिसू लागला. असे थोडे थोडे पुढे जात जात एवढा मोठा डोंगर मी कधी उतरलो मलाच कळले नाही. तू असा नुसता बसून राहू नकोस. तुझ्या प्रवासाला तू सुरूवात कर. या कंदिलाच्या प्रकाशात तुला जेवढा रस्ता दिसेल तेवढा पार कर पुढचा मार्ग तुला आपोआपच दिसू लागेल. तू नक्कीच डोंगराच्या माथ्याशी पोहचशील.'
तुम्हीही फक्त विचार करत बसू नका. हजार विचारांपेक्षा एक कृती जास्त महत्त्वाची व फायदेशीर असते हे लक्षात ठेवा. कदाचित तुम्ही एखादी चुकीची कृती कराल मात्र त्यातूनच तुम्हांला पुढचा अपेक्षित मार्ग सापडेल व तुमच्या ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरू होईल. म्हणूनच तुमचे एखादे काम करायचे राहून गेले असेल, रेंगाळले असेल तर आजच त्याची सुरूवात करा. तुम्हांला जरूर यश मिळेल.

No comments:

Post a Comment