प्राथमिकता
आयुष्यात आपल्याला अनेक निर्णय असे घ्यावे लागतात की ज्याचा यशापयशाशी संबंध नसतो पण ते खूप महत्त्वपूर्ण असतात. आपल्या भावी आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही निर्व्यसनी आहात आणि कॉलेजमधल्या मित्राने तुम्हांला सिगारेट, दारू किंवा इतर एखाद्या व्यसनासाठी आग्रह केला तर? येथे यश किंवा अपयश मिळण्याचा प्रश्न नाही. पण तुमचा निर्णय तुमच्या भावी आयुष्यावर परिणाम करणार आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीत निर्णय घेण्यापूर्वी तुम्हांला पुढे दिलेल्या प्राथमिकतेचा क्रम लक्षात ठेवायचा आहे.
१ १)     कुटुंबीय : कुटुंबीय अर्थातच आपले आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, सासू-सासरे इ. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या या निर्णयामुळे आपल्या कुटुंबीयांवर त्याचा काय परिणाम होईल? त्यांना काय वाटेल? ते आनंदी होतील की दुःखी? त्यांना अभिमान वाटेल की तुमची लाज वाटेल? याचा विचार करा. वरील उदाहरणात जर तुम्ही व्यसनासाठीचा मित्राचा आग्रह स्वीकारलात तर तुमच्या कुटुंबीयांना निश्चितच ही गोष्ट आवडणार नाही, ते तुमच्यावर चिडतील. म्हणून तुमचा निर्णय मित्राला नकार हाच असला पाहिजे. तुम्ही म्हणाल जर मित्र नाराज झाला तर? तो माझ्यावर चिडला तर? आमची मैत्री तुटली तर? खरंतर तुम्हांला व्यसनासाठी किंवा इतर वाईट गोष्टींसाठी प्रवृत्त करणारा, आग्रह करणारा तुमचा खरा मित्र असूच शकत नाही आणि अशा प्रकारच्या तुमच्या नकाराने तुमची मैत्री तुटणार असेल तर ती मैत्रीदेखील कमजोर आहे हे निश्चित समजावे. अशा प्रकारचे मित्र आणि त्यांची मैत्री तुटली तर वाईट वाटायला नको. मित्रांपेक्षा तुम्ही तुमच्या कुटुंबीयांनाच प्राथमिकता दिली पाहिजे. तुमच्या कुटुंबाचा फायदा होईल असा निर्णय प्राधान्याने घ्या. मग भलेही तुम्हांला थोडा त्रास सहन करावा लागेल पण कुटुंबासाठी तुम्ही तो सोसला पाहिजे. वैयक्तिक सुख-स्वप्नांमुळे तुमच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होणार असेल, त्यांना दुःख पोहोचणार असेल तर तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊनही तुम्ही दुःखीच राहणार आहात. स्वप्नपूर्तीचे समाधान तुम्हांला मिळणार नाही हे लक्षात ठेवा.
     २) तुम्ही स्वतः : जर तुमच्या निर्णयामुळे तुमच्या कुटुंबीयांना नुकसान पोहोचणार नसेल, त्यांना दुःख होणार नसेल तर मग आता विचार करा की या निर्णयाचा तुम्हांला वैयक्तिक फायदा-तोटा काय? अर्थातच तुमच्या फायद्याचा निर्णय घ्या. मात्र काही प्रसंगांमध्ये तुमच्या एखाद्या निर्णयाशी कुटुंबीयांचे वैचारिक मतभेद असू शकतात. उदा. तुम्ही कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, नोकरी करावी की व्यवसाय करावा, घरचा व्यवसाय सांभाळावा की दुसरा व्यवसाय करावा इ. अशावेळी भांडणतंटा न करता, शांततेने व प्रेमाने कुटुंबियांची समजूत घालून स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची एक संधी त्यांच्याकडून मागून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत कुटुंबियांशी संबंध तुटणार नाहीत याची काळजी घ्या. घर सोडून निघून जाणे, आत्महत्या अशा गोष्टी सर्वांसाठीच त्रासदायक व नुकसानकारक असतात.  कुटुंबियांनीदेखील अशावेळी समजूतदारपणा दाखवावा.
     ३) समाज : यामध्ये तुमचे इतर नातेवाईक, मित्रमंडळी व इतर सर्व लोक येतील. एखादेवेळी असा प्रसंग तुमच्या समोर येईल की त्यातून तुमच्या कुटुंबियांचा किंवा तुमचा फायदा किंवा तोटा यांपैकी काहीही होणार नाही, अशावेळी यातून समाजाचा फायदा होईल की तोटा होईल याचा विचार करा व निर्णय घ्या. उदाहरणार्थ, निःस्वार्थी मनाने मित्राला किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत करताना तुमच्या कुटुंबाचा किंवा तुमचा फायदा-तोटा नसतो मात्र त्या मित्राला किंवा अनोळखी व्यक्तीला निश्चितच फायदा होतो.

समाजाकडून चांगले मिळावे असे तुम्हांला वाटत असेल तर तुम्हीही समाजाला चांगले दिले पाहिजे. समाज हा समुद्रासारखा असतो. तुम्ही त्याला जे द्याल ते तुम्हांला परत मिळते. अनोळखी माणसाला मदत करून काय उपयोग? हा माणूस कदाचित पुन्हा आपल्याला कधीच  भेटणार नाही असा विचार कदाचित तुम्ही कराल. अशावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा अनोळखी माणसाला त्याच्या गरजेच्यावेळी मदत करता तेव्हा दुसरा एखादा अनोळखी माणूस येऊन तुम्हांला तुमच्या गरजेच्यावेळी मदत करतो. म्हणजेच आपण ज्या अनोळखी व्यक्तीला मदत करतो त्यानेच येऊन मदतीची परतफेड करायला हवी हा विचार करू नका. समजा तुम्ही रस्त्याने येता जाता अनेकवेळा अनोळखी व्यक्तींना 'लिफ्ट' देता. जर एखादेदिवशी तुमच्याकडे गाडी नसेल, तुम्हांला कुणाच्यातरी 'लिफ्ट'ची गरज असेल तेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती (ज्याला तुम्ही कधीही लिफ्ट दिलेली नाही) तुमच्यासाठी गाडी थांबवेल आणि तुम्हांला 'लिफ्ट' देईल. म्हणून शक्य तेवढे इतरांना मदत करत जा. इतर लोक तुम्हांला मदत करतील.
      वर दिलेला क्रम लक्षात ठेवून त्यानुसार निर्णय घ्या. तुम्हांला नक्कीच सुख-समाधान व यश मिळेल.

No comments:

Post a Comment