गुरुकिल्लीगुरुकिल्ली (उदासीनता/शून्य स्थिती) :
आता या पुस्तकातील शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा अर्थात यशाची आणि चिंतामुक्तीची गुरुकिल्ली. पुढे दिलेली वाक्ये तुम्ही नेहमी वापरता किंवा ऐकता.  रडू नको, सर्व काही ठिक होईल, रागाच्या भरात भलतंच काहीतरी करशील, डोकं शांत ठेव, उत्साहाच्या भरात माझ्याकडून चूक झाली इत्यादी. या आणि अशा प्रकारच्या अनेक वाक्यात एक गोष्ट समान आहे की डोकं शांत ठेवणे गरजेचे असते. रडणे, चिडणे, अतिउत्साह, अतिआनंद यासारख्या बर्‍यावाईट सर्वच प्रकारच्या गोष्टींमुळे आपले डोके शांत राहू शकत नाही व आपल्या हातून एखादी चूक घडते. जेव्हा तुम्ही व्यायाम किंवा योगा करता त्यावेळीदेखील मन शांत ठेवण्यासंबंधी सांगितले जाते.
      समजा असे एक यंत्र आहे ज्यामध्ये आपली मानसिक स्थिती मोजली जाते. म्हणजेच तुम्ही जेव्हा शांत असता तेव्हा यंत्रातील काटा शून्यावर असतो. जेव्हा तुम्ही आनंदीत होता, म्हणजेच तुमच्या मनात सकारात्मक भावना असतात, तेव्हा काटा तेवढ्या प्रमाणात शून्याच्या वर वर सरकतो. जेव्हा तुम्ही दुःखी होता किंवा चिडता म्हणजेच तुमच्या मनात नकारात्मक भावना असतात, तेव्हा काटा तेवढ्या प्रमाणात शून्याच्या खाली खाली सरकतो. शून्याच्यावर धन चिन्ह म्हणजे अधिक चिन्ह असते तर शून्याच्या खाली ऋण चिन्ह म्हणजेच वजा चिन्ह असते. आपल्या मनातील भाव जसजसे बदलतात तसतशी काट्याची स्थिती अधिक चिन्हाकडे किंवा वजा चिन्हाकडे सरकत असते. पण या काट्याला एक स्प्रिंग असते जी काट्याला शून्याकडे खेचत असते. तुम्ही जेवढे जास्त आनंदीत व्हाल तेवढा काटा जास्तीत जास्त अधिक चिन्हाकडे वर वर सरकू लागेल व स्प्रिंगही तेवढीच ताणली जाईल. उदाहरणासह ही संकल्पना अधिक स्पष्ट करतो.
      समजा तुम्हाला अधिक दोन (+२) इतका आनंद झालेला आहे. अशा आनंदाच्यावेळी तुम्हांला वजा दोन (-२) इतके दुःख झाले.  २-२ = ० हे आपल्याला माहित आहे. म्हणजेच काटा आता शून्यावर यायला हवा. मात्र काट्याला स्प्रिंग असल्यामुळे काटा लगेच शून्यावर येऊन थांबत नाही तर ( २) पासून शून्याकडे खाली उतरताना शून्याच्या आणखी खाली जाऊन मग शून्यावर येऊन स्थिरावतो. म्हणजेच काटा वजा एक (-१) अंकाला स्पर्श करून मग शून्यावर येतो. अशा तर्‍हेने दुःख (-२) असले तरी (-३) एवढे झाल्यासारखे वाटते. म्हणूनच आनंदाच्या क्षणी छोटीशी वाईट घटना घडली तरी फार दुःख होते. याउलट दुःखाच्या वेळी आनंदाची छोटीशी गोष्टदेखील खूप सुखावून जाते. कारण ( ३) एवढा आनंदाचा क्षण असेल तरी काटा ( ४) एवढा आनंद दाखवून मग ( ३) दाखवतो. त्यामुळे काही क्षणतरी आपण सुखावतो.
      ज्यांना उदाहरणावरून ही संकल्पना नीट समजली नाही त्यांनी केवळ एवढेच लक्षात ठेवा की तुम्हांला खूप आनंद झाला तर काटा शून्याच्या वरवर जाऊ लागतो आणि दुःख झाले तर शून्याच्या खाली खाली येऊ लागतो. जर तुम्हांला सुखी जीवन जगायचे असेल तर हा काटा शून्याच्या आसपासच राहील, याची खबरदारी घेतली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर खुप दुःखी झाला असाल तर लगेचच डोळे मिटून अशी कल्पना करायची की काटा शुन्याच्या खूप खाली गेला आहे व तो आता हळूहळू शून्यावर येऊन थांबला आहे. तुम्हांला खूप आनंद झाला असला तरी आपल्या मनावर आवर घालणे गरजेचे असते. कारण त्यातूनही एखादी चुकीची गोष्ट आपल्या हातून घडण्याची शक्यता असते. म्हणजेच सुखी जीवनासाठी तुम्हांला मनाची शून्य स्थिती टिकवून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. एखादे यश मिळण्यापूर्वीच मोठमोठी स्वप्ने पाहत बसायचे नाही किंवा अपयश तर मिळणार नाही ना म्हणून चिंताही करत बसायची नाही.
      तुमचे मित्र अनेकवेळा तुमच्याकडे स्वा मागत असतील. 'अरे माझ्यासमोर अमूक अमूकएक अडचण आहे, मी काय करू?' तुम्ही त्यांना उपयुक्त स्वाही देत असाल. मात्र काहीवेळा आपल्यासमोर एखादी अडचण येते व अशावेळी काय करावे समजत नाही व आपण दुसर्‍याकडे स्वा मागतो. हे असे का होते? याचे कारण म्हणजे जेव्हा मित्रासमोर अडचण असते तेव्हा त्याच्या मनाचा काटा शून्याच्या खाली गेलेला असतो. त्यामुळे त्याला उपाय सापडत नाही. त्याला कोणाच्यातरी सल्ल्याची गरज भासते. तुम्ही मात्र त्या अडचणींपासून तटस्थ असता. त्यामुळे तुमच्या मनाची स्थिती शून्य असते. त्यामुळेच तुम्ही व्यवस्थित विचार करून तुमच्या मित्राला योग्य स्वा देऊ शकता. मात्र जेव्हा तुमच्यासमोर अडचण उभी राहते तेव्हा तुमच्या मनाची स्थिती शून्य राहत नाही, त्यामुळे तुम्हांला उपाय सापडत नाही. म्हणूनच तुम्हांला तुमच्या अडचणींवर मात करायची असेल तर मनाचा काटा शून्याच्या आसपास ठेवायला शिकले पाहिजे. आपल्या अडचणींकडे तटस्थपणे पाहता यायला हवे.
      आपल्या मनाचा काटा जेवढा स्थिर राहील, तितके तुमचे जीवन स्थिर राहील. तुमचे मन समाधानी राहील. मनाची हीच शून्य स्थिती, मनाची हीच उदासिनता, मनाचा हा तटस्थपणा 'कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन' या वाक्यात सांगितली आहे. तुम्ही तुमच्या बाजूने कर्म करत रहा, पण यश मिळेल की अपयश, आनंद मिळेल की दुःख याबाबत कोणताही विचार करू नका.
      प्रयोग क्र. १ पुन्हा वाचा. त्यात मी तुम्हांला सांगितले आहे की दुस-या कंपनीत नोकरीचा अर्ज पाठवून द्या. पण ती नोकरी मिळेल की नाही याबद्दल विचार करू नका. म्हणजेच मिळणार्‍या फळाचा विचार करू नका. त्याऐवजी दुसरे एखादे काम हातात घ्या व ते पूर्ण करण्याच्या मागे लागा. पुढील सात दिवसांसाठी प्रयोग म्हणून एखादे काम हातात घ्या आणि मनात ही शून्य स्थिती, उदासिनता ठेवून काम पूर्ण करा. तुम्हांला कदाचित विश्वास बसणार नाही पण हा प्रयोग पुन्हा पुन्हा केल्यावर तुमच्या लक्षात येईल की हळूहळू प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत तुम्हांला यश मिळत आहे. या शून्य स्थितीने तुमचे जीवन सुखी बनेल. यशस्वी बनेल.

      माझे विचार मी या पुस्तकामार्फत तुमच्यासमोर मांडले आहेत. तुम्हीही पुस्तकात दिलेल्या प्रत्येक मु्‌द्याबाबतचा अनुभव घेण्यासाठी छोटे छोटे प्रयोग करा. जो मुद्दा तुम्हांला सर्वात चांगला अनुभव देईल, त्याचा वापर करून अधिकाधिक यश संपन्न करा. तुम्हांला सुखी व यशस्वी जीवनासाठी माझ्या हार्दीक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment